कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यापासून रेल्वे आणि बससेवा बंद करण्यात आली. मात्र आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येत आहे. लालपरी काही दिवसांपासून रस्त्यावर धावण्यास सुरुवात झाली आहे. आता रेल्वे कधी रूळावर धावणार? असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित केला जात असून प्रवाशांना रेल्वेची प्रतीक्षा लागली आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यामुळे रेल्वेला देखील ब्रेक लागला. केवळ विविध ठिकाणी अडकलेल्या परप्रांतीय कामगारांसाठी शासनाने ठरवून दिलेल्या निर्देशानुसार विशेष रेल्वे धावल्या. गेल्या पाच महिन्यापासून रेल्वे सेवा बंद केली आहे. त्यातच पाच महिने उलटूनही कोरोना रुग्णांची संख्या पाहिजे तेवढी कमी झालेली नाही. त्यामुळे कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता रेल्वे सुरू करणे कितपत योग्य आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर दुसरीकडे मात्र बाजारपेठ, उद्योगव्यवसाय हळूहळू पूर्वपदावर येणे सुरू झाले आहे. तर रेल्वे कधी रूळावर येणार? याची प्रतीक्षा प्रवाशांकडून केली जात आहे. नागरिकांची गैरसोय लक्षात घेता एसटी महामंडळाच्या वतीने जिल्हाअंर्तगत बसेस देखील सुरू केल्या आहेत. लालपरी रस्त्यावर धावू लागली आहे. आता रेल्वे कधी रूळावर येणार याकडे देखील प्रवाशांचे लक्ष लागून आहे. दुसरीकडे अजूनही कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळे रेल्वे सुरू होईल असे वाटत नाही. असे असंख्य तर्क वितर्क प्रवाशांकडून लावले जात आहेत. इतकेच नव्हे तर आता बस सुरू झाल्यात रेल्वे देखील सुरू होऊ शकते, अशी शक्यता देखील प्रवाशांकडून वर्तवली जात आहे. परंतु रेल्वे बोर्डाने रेल्वे सुरू करण्यासाठी अद्याप कुठल्याही प्रकारचा निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे प्रवाशांना अजून शासनाचे निर्देश येईपर्यंत रेल्वेची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
शासनाच्या निर्णयाकडे रेल्वे विभागाचे लक्ष
रेल्वे कधी सुरू कराव्यात? यावर अद्यापही शासनाने निर्णय घेतलेला नाही. रेल्वे विभागाला देखील रेल्वे सुरू करण्याचे अद्यापही कुठल्याही प्रकारचे आदेश आलेले नाहीत. शासन यावर निर्णय घेईल तेव्हाच रेल्वे सुरू करण्यात येईल. असे रेल्वे विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे.